10 महिने ago
1.1K views

अशोक सराफ मराठी चित्रपट लिस्ट (Top 10)

Ashok Saraf
10 महिने ago

Ashok Saraf Top 10 Movies List

मामा या आपुलकीच्या शब्दाने मराठी सिनेसृष्टीत ओळखल्या जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते अशोक सराफ. अशोक सराफ (Ashok Saraf) नावाचे जादुई रसायन माहीत नाही असा क्वचितच मराठी माणूस सापडेल. नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या पिढीचे बालपण समृद्ध करणारे अशोक सराफ यांची ओळख ही टायमिंग आणि पंचेसचा बादशाह अशी आहे. विनोदी भूमिकांसाठी ते केवळ मराठीतीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील अव्वल कलाकारांपैकी एक आहेत. नागपुरात जन्मलेल्या अशोक मामा नाटक-सिनेमात येण्याआधी बँकेत नोकरी करत होते. पण अभिनयाचा किडा स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी कलाक्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं ते ही विदूषकाच्या भूमिकेत. . त्यांचं पहिलं नाटक होतं शिरवाडकरांचं “ययाती आणि देवयानी”.

विदूषकाच्या छोट्याश्या भूमिकेने त्यांच्या या अवाढव्य कारकिर्दीची सुरुवात झाली होती. सुमारे पाच दशकांपूर्वी अशोक सराफ यांची चालू झालेली ही हास्य यात्रा अजूनही सुरू आहे. ‘शेंटीमेंटल’ या मराठी सिनेमात त्यांनी पुन्हा खाकी वर्दी घातली होती. त्यांचे सगळे चाहते हीच प्रार्थना करतात की, त्यांचा प्रवास असाच पुढे चालू राहो. त्यांना स्क्रीनवर पहाताना, आपल्या चेहर्यावर एक मोठ्ठं हसू असण्याची खात्रीच आहे !

चला तर मग आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशोक सराफ यांचे गाजलेले १० चित्रपट. 

१. धुमधडाका (Dhumdhadaka)

‘व्याह्या विहही व्यूहया’ करणारा अशोक विसरता विसरत नाही तो हा चित्रपट. शशी कपूरच्या हिंदी ‘प्यार किये जा‘ची मराठी कॉपी असली तरी हा सिनेमा म्हणजे अस्सलाला मागे टाकेल अशी भारी कॉपी होती. आपल्या लग्नासाठी तीन तरुण उद्योगपती धनाजी वाकडे यांना इम्प्रेस करण्यासाठी जे काही उद्योग करतात, ते पाहून हसून हसून पुरेवाट झाल्याशिवाय राहत नाही. या सिनेमात निवेदिता जोशी यांचीही प्रमुख भूमिका होती. हा सिनेमा 1985 मध्ये रिलीज झाला होता. अशोक सराफ यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरलेला आणि सुपरहिट असा हा सिनेमा राहिला होता. महेश कोठारे यांनी डायरेक्ट केलेल्या या सिनेमात अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी धमाल केली होती. महेश कोठारे यांनीही यात मध्यवर्ती भूमिका केली होती.

हा सिनेमा तुम्ही Zee5 वर पाहू शकता. 

२. गंमत जंमत (Gammat Jammat)

Gammat Jammat marathi movie

लिजेंडरी गायक किशोर कुमार यांनी गायलेलं आणि हिट झालेले ‘अश्विनी ये ना‘ हे गाणे याचं सिनेमातलं! कर्जाच्या बोझ्यामुळे वैतागलेला फाल्गुन गौतमसोबत पैसे मिळवण्यासाठी श्रीमंत बापाच्या पोरीला किडनॅप करतो तर ती पोरगी दोघांच्याही डोक्यावर मिरे वाटते. कल्पना ही गर्भश्रीमंत उद्योगपती (श्रीकांत मोघे) यांची कन्या असते. हे दोघेही कल्पनाचे किडनॅपिंग करण्यात यशस्वी होतात. पण त्यांना धक्काच बसतो, जेव्हा कल्पनाचे वडील पैसे द्याला नकार देतात. त्यांनी पोलिस इन्सपेक्टरला (सतीश शहा) चौकशीसाठी धाडलेले असते. हा सिनेमा फाल्गुन (अशोक सराफ) आणि गौतम (सचिन) या दोन कॅरेक्टर्सभोवती फिरतो.

हा सिनेमा तुम्ही Airtel Extreme वर पाहू शकता.

३. आयत्या घरात घरोबा (Aayatya Gharat Gharoba)

Aayatya Gharat Gharoba

आठवतं? किर्तीकर फॅमिली आपला बंगला बंद ठेऊन तीन महिन्यांसाठी लंडनला जात असतात. तर गोपीनाथ हा त्या बंगल्यात किर्तीकर फॅमिली परदेशात गेली की मालकासारखा राहत असतो. दुसऱ्याच्या घरात मालक असल्याप्रमाणे राहणाऱ्या गोपूकांकाचं हे गुपित केदारला समजते. त्यांना धडा शिकविण्यासाठी केदार स्वत:च्या घरात नोकर म्हणून जातो. त्यानंतर खरं-खोटं, लपवा-लपवीमध्ये विनोदी शैलीतील चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना भावूक करून जातो.  हो! तोच हा सिनेमा! आयत्या घरात घरोबा. सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शिक केलेल्या या सिनेमात अशोक सराफ यांच्याबरोबर खुद्द सचिन, सुप्रिया पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, राजेश्वरी, किशोरी शहाणे यांनी प्रमुख भूमिका निभावली होती. हा हलका-फुलका सिनेमा प्रेक्षकांना आवडला होता. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. 

हे पण पहा - लक्ष्मीकांत बेर्डे यांचे गाजलेले १० चित्रपट

४. अशीही बनवाबनवी (Ashi Hi Banwa Banwi)

चार बॅचलर मित्र राहण्यासाठी घर शोधत असतात. त्यांना एक घर मिळते, पण तिथे लग्न झालेल्यांनाच घर भाड्याने देणार अशी अट असते. मग घर मिळवण्यासाठी चारपैकी दोन मित्र महिलेचे रुप घेतात आणि त्यांच्या पत्नी असल्याचे घर मालिकिणीला सांगतात. लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन यांनी महिलेची भूमिका जबरदस्त केली होती. हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता.

“लिंबाचं मटण”, “सत्तर रुपये वारले”, “हा माझा बायको”, “वाट बघा, म्हणजे काय”, डोहाळे लागलेत ओ” असे कित्येक संवाद आजही मराठी पब्लिकला तोंडपाठ आहेत. हे संवाद अशोक सराफ यांच्या अचूक टायमिंग शिवाय लक्षात राहिलेच नसते.

विनोदी चित्रपटांच्या काळातला हा एक मानबिंदू आहे. या चित्रपटाबद्दल भरपूर बोलता येईल. आज फक्त अशोक सराफ यांच्या बाबतीत बोलू. अशोक सराफ यांच्या विनोदाचं अचूक टायमिंग बघायचं असल्यास हा चित्रपट आदर्श ठरावा.

५. एक उनाड दिवस (Ek Unaad Divas)

Ek Unaad Divas

एक उनाड दिवस हा विजय पाटकर यांनी इ.स. २००५ मध्ये दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे. चित्रपटात अशोक सराफ, विजू खोटे, सुधीर जोशी, इला भाटे व फैयाज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अशोक सराफ यांनी “विश्वास दाभोळकर” हे पात्र साकारलं होतं. विश्वास दाभोळकर म्हणजे शिस्तशीर माणूस. मुळात दाभोळकर घराण्यातच तशी शिस्त आहे. तर अशा या माणसाच्या आयुष्यातील एका उनाड दिवसाची कहाणी म्हणजे एक उनाड दिवस.

अशोक सराफ यांनी शिस्तशीर विश्वास दाभोळकर आणि त्याच्यात होत जाणारे बदल चांगल्या प्रकारे टिपले होते. प्रचंड पैसा पण हाती वेळ नाही, यंत्र मानवाप्रमाणे काम करणारा उद्योगपती. एक दिवस गाडी खराब झाल्यामुळे पायी चालत जात असताना त्याला शाळेतला जुना मित्र भेटतो. जो एका ठिकाणी चर्तुथश्रेणी कर्मचारी असतो. अल्पशा पगारात, कुटुंबापासून दूर राहूनही तो सुखात असतो. पण आपल्याकडे एवढा पैसा असूनही आपण दुखीः जीवन जगतो, याची अनुभूती त्या उद्योगपतीला होता. मग तो दिवस आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा तो ठरवतो आणि जगतोही अशी काहीशी सिनेमाची कथा आहे. 

६. एकापेक्षा एक (Eka Peksha Ek)

Eka Peksha Ek

आर्थर हिलरच्या 1989 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सी नो इविल, हिअर नो इविल‘ या विनोदी चित्रपटावर आधारित असलेला एकापेक्षा एक हा मराठी सिनेमा. लक्ष्मीकांत बेर्डे यात बहिरा तर सचिन पिळगावकर आंधळा दर्शवलेला आहे तर इन्सेप्क्टरच्या भूमिकेत आहे अशोक सराफ. हा एक अफलातून सिनेमा होता. नवरा माझा नवसाचा Navara Maza Navsachaन केलेल्या गुन्ह्यात शिक्षा झालेले दोन दिव्यांग मित्र आणि आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे बघण्यासारखे आहे. बहिरेपणामुळे भलतेच काहीतरी ऐकणारा लक्ष्या, तर अंधत्वामुळे आदळआपट करणारा सचिन यांच्या केमिस्ट्री सोबत चणे खाणाऱ्या विनोदी इंस्पेक्टरमधले अशोक सराफ देखील रॉकसॉलिड वाटतात. 

७. नवरा माझा नवसाचा (Navra Mazha Navsacha)

आजही ‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमा टीव्हीवर लागला तर तितक्याच आवडीने पाहिला जातो. अशोक सराफ, सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर, यांच्या अभिनयाने धमाल उडवून दिली होती. हा सिनेमा प्रचंड हिट ठरला होता. चिन हे स्वतः प्रमुख भूमिकेत होते. तर अशोक सराफ हे एसटी कंडक्टरच्या भूमिकेत. नवस फेडायला निघालेले सचिन ज्या एसटीत असतात त्या एसटीचे अशोक सराफ हे कंडक्टर असतात. संपूर्ण प्रवासात जे प्रसंग घडतात ते फुल्ल टू कॉमेडी आहेत. सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, जॉनी लीव्हर, रीमा लागू, विजय पाटकर, निम्रिती सावंत, वैभव मांगले, प्रदीप पटवर्धन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा सिनेमा २००४ साली प्रदर्शित झाला. सोनू निगमने या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. त्याचबरोबर यात एक गाणेही गायले होते.

हा सिनेमा तुम्ही Prime Videos वर पाहू शकता.

८. गुपचूप गुपचूप (Gupchup Gupchup)

Gupchup Gupchup

मी प्रोफेसर धोंड! च्यांक की रें म्हणणारा आणि सतत पॅन्ट वरती ओढणारा हा रोल अशोक सराफांनी अजरामर केला. काही सिनेमे कितीदाही पहिले तरी कंटाळा येत नाही, उलट पुन्हा पाहताना मजाच येते. गुपचूप गुपचूप हा असाच सिनेमा आहे. सिनेमात श्रीराम लागू चक्क टीशर्ट पॅन्ट घालतात, हेमी आणि शामी या पोरींना गोव्याला कॉलेजात पाठवून  पद्मा चव्हाण या मुलींच्या गव्हर्नेससोबत लिव्ह इन मध्ये राहतात, आगाऊ हेमी म्हणजेच रंजना दोघी बहिणींचा डबल रोल करते, कुलदीप पवारांच्या फिरक्या घेते हे सगळं या सिनेमात असलं तरी त्यातल्या प्रोफेसर धोंडशिवाय सिनेमात मज्जा नाय हो..

९.  एक डाव भुताचा (Ek Daav Bhutacha)

Ek Daav Bhutacha

अडचणीत सापडलेल्या एका साध्या भोळ्या शिक्षकाला मार्गदर्शन करणारा भूत अशोक सराफ यांनी चांगलाच रंगविला होता. या सिनेमात दिलीप प्रभावळकर, रंजना, सुलोचना, मोहन जोशी, मोहन कोठिवान हे ताकदीचे कलाकार होते. या कॉमेडी-ऍक्शन थ्रिलर सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली होती. एक जबरदस्त फार्सिकल, विनोदी पंचेसने खळखळून हसवणाऱ्या या चित्रपटात अशोक सराफ यांच खंडुजी फर्जंद नावाच भूत त्यावेळी चांगलंच गाजलं होतं. आजही हा सिनेमा चॅनलवर लागला कि रसिक आवर्जून ट्यून इन करून आनंद घेतात. 

१०. एक डाव धोबीपछाड (Ek Daav Dhobi Pachhad)

Ek Daav Dhobi Pachhad

अशोक सराफ यांनी साकारलेला दादासाहेब दांडगे हा एकेकाळचा गुंड पण आता त्याला सुधारायचं आहे. त्यासाठी तो संस्कृत पण शिकतो. पण आपले पाप धुवून चांगल्या मार्गाला लागणं एवढं सोप्पं नसतं. अशोक सराफ यांनी ही भूमिका अफलातून वठवली होती. दादा दांडगेच्या गावातल्या प्रसिद्ध गुंडांच्या कथेपासून चित्रपटाची सुरुवात होते आणि नंतर त्याला त्याचे किशोरवयीन प्रेम सापडते परंतु हेमा एक सुशिक्षित महिला म्हणून तिने एका गुंडाशी लग्न करण्यास नकार दिला. या घटनेमुळे दादांचे आयुष्य बदलले आणि त्याने आपले सर्व बेकायदेशीर व्यवसाय सोडतो, त्याच्या प्रेमासाठी, तो स्वत: ला आणि आजूबाजूचे लोक बदलू लागतो. सिनेमाच्या शेवटी एक क्लायमॅक्स सुद्धा आहे जो बघितल्यावर श्रोते हसण्यासोबत भारावून सुद्धा जातात. झी टॉकीजची निर्मिती असलेला हा सिनेमा २००९ साली प्रदर्शित झाला होता. 

हा सिनेमा तुम्ही Jio Cinema वर पाहू शकता. 

तर मग मंडळी कशी वाटली हि अशोक सराफांच्या गाजलेल्या सिनेमांची यादी? आवडली का? या यादीत आम्ही कुठला सिनेमा मिस केला असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळू द्या. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Your email address will not be published.

Don't Miss