2 वर्षे ago
1.7K views

लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपट लिस्ट (Top 10)

2 वर्षे ago

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे गाजलेले १० चित्रपट. Laxmikant Berde Top 10 Movies List

आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटांना संजीवनी देणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं. ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम आपल्या सोबत आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे हे केवळ एक अभिनेता नसून ती एक जादू होती. 16 डिसेंबर 2004 रोजी या अभिनेत्याने जगाचा कायमचा निरोप घेतला. आज त्यांना जाऊन १९, २० वर्ष होत आली आहेत, परंतू आजही त्यांचा चित्रपट बघतांना लक्ष्या आपल्यात नाही हे मनसुद्धा मानत नाही. एक गाडी बाकी अनाडी, धडाकेबाज, खतरनाक, एकापेक्षा एक, आयत्या घरात घरोबा, एक होता विदूषक, अशी हि बनवाबनवी, शेम टु शेम असे एक से बढकर एक सुपरडुपर हिट सिनेमे लक्ष्याने आपल्याला दिले आहेत. 

चला तर मग आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे गाजलेले १० चित्रपट. 

१. धडाकेबाज (Dhadakebaaz)

Dhadakebaaz

मराठी सिनेसृष्टीतील प्रचंड गाजलेल्या चित्रपटांमधील एक चित्रपट म्हणजे ‘धडाकेबाज’. महेश कोठारे दिग्दर्शित ‘धडाकेबाज’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अश्विनी भावे आणि दिपक साळवी या कलाकारांच्या उत्तम अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याकाळी या चित्रपटातील गंगाराम आणि कवट्या महाकाळ या भूमिका सर्वाधिक गाजल्या. इतकंच नाही तर कवट्या महाकाळ ही व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या आठवणींत आहे.  या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांना एक जादूची बाटली मिळते. त्या बाटलीत असतो गंगाराम. त्याच्याकडे असते ती जादूची रेती. ही रेती वापरून गंगाराम लक्ष्या आणि त्याच्या मित्रांची मदत करतो एकंदरीत अशी सिनेमाची कथा आहे. 

हा सिनेमा तुम्ही Zee5 वर पाहू शकता. 

२. एक गाडी बाकी अनाडी (Ek Gaadi Baki Anadi)

Ek Gaadi Baki Anadi

लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, लता अरुण अशी सिनेमाची स्टारकास्ट असलेला एक गाडी बाकी अनाडी हा सिनेमा. एक सुखी कुटुंब ज्यात आई, वडील आणि त्यांचा लहानगा मुलगा असतो. वडील कामाशी इमानदार असल्याने कपटी सहकारी लालसेपायी त्यांचा काटा काढतात आणि खून करतात. इकडे आई मुलाला मोठं करते जो सिनेमाच्या कथेचा नायक लक्ष्या आहे. वडिलांचा आत्मा अजूनही त्यांच्या गाडीत वास करतो जो क्षणोक्षणी लक्ष्याची मदत करत असतो. शेवटी हि गाडी आणि लक्ष्या मिळून वडिलांच्या खुनाचा बदल घेतात असं काहीसं सिनेमाचं कथानक आहे. सिनेमा अतिशय मनोरंजक असून सिनेमाचा हिंदी रिमेक सुद्धा बनलेला आहे “टारझन- द वन्डर कार” तो सुद्धा तुम्ही बघितला असेलंच यात काही शंका नाही. 

हा सिनेमा तुम्ही Prime Video वर पाहू शकता. 

३. खतरनाक (Khatarnak)

Khatarnak Marathi Movie

लक्ष्या केवळ विनोदी सिनेमांतच दिसला आहे असं नाही, थ्रिलर, सस्पेन्स मुव्हीमध्ये सुद्धा तो झळकला आहे. खतरनाक हे त्यापैकीच एक नाव. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, भरत जाधव, जॉनी लिवर सदाशिव अमरापूरकर अशी दिग्गज सिनेमाची स्टारकास्ट. सिनेमात दर अमावस्येला खून होतो आणि पोलीससुद्धा तपास करण्यात अयशस्वी होतात, आणि भरत आणि लक्षाने काढलीये डिटेक्टिव्ह एजन्सी आणि पुढे यांच्या मदतीनेच इन्स्पेक्टर महेश कसे खुन्यापर्यंत पोचतात आणि तो खुनी नेमका कोण? याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल आणि तुम्ही हा सिनेमा आधी कधी पहिला नसेल तर एकदा जरूर बघायला हवा असा हा सिनेमा आहे. 

हा सिनेमा तुम्ही Prime Video वर पाहू शकता. 

४. आयत्या घरात घरोबा (Aayatya Gharat Gharoba)

Aayatya Gharat Gharoba

सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शिक केलेल्या या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन, सुप्रिया पिळगावकर, राजेश्वरी, किशोरी शहाणे यांनी प्रमुख भूमिका निभावली होती. हा हलका-फुलका सिनेमा प्रेक्षकांना आवडला होता. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. आठवतं? किर्तीकर फॅमिली आपला बंगला बंद ठेऊन तीन महिन्यांसाठी लंडनला जात असतात. तर गोपीनाथ हा त्या बंगल्यात किर्तीकर फॅमिली परदेशात गेली की मालकासारखा राहत असतो. दुसऱ्याच्या घरात मालक असल्याप्रमाणे राहणाऱ्या गोपूकांकाचं हे गुपित केदारला समजते. त्यांना धडा शिकविण्यासाठी केदार स्वत:च्या घरात नोकर म्हणून जातो. त्यानंतर खरं-खोटं, लपवा-लपवीमध्ये विनोदी शैलीतील चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना भावूक करून जातो.  हो! तोच हा सिनेमा! आयत्या घरात घरोबा. 

५. अशीही बनवाबनवी (Ashi Hi Banwa Banwi)

आजच्या जनरेशनमध्ये एक कल्ट क्लासिक कॉमेडी समजला जाणारा, सचिन पिळगावकर दिग्दर्शित सिनेमा म्हणजे अशी हि बनवाबनवी. चार बॅचलर मित्र राहण्यासाठी घर शोधत असतात. त्यांना एक घर मिळते, पण तिथे लग्न झालेल्यांनाच घर भाड्याने देणार अशी अट असते. मग घर मिळवण्यासाठी चारपैकी दोन मित्र महिलेचे रुप घेतात आणि त्यांच्या पत्नी असल्याचे घर मालिकिणीला सांगतात. लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन यांनी महिलेची भूमिका जबरदस्त केली होती. हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता. “लिंबाचं मटण”, “सत्तर रुपये वारले”, “हा माझा बायको”, “वाट बघा, म्हणजे काय”, डोहाळे लागलेत ओ” असे कित्येक संवाद आजही मराठी पब्लिकला तोंडपाठ आहेत. हे संवाद अशोक सराफ यांच्या अचूक टायमिंग शिवाय लक्षात राहिलेच नसते. विनोदी चित्रपटांच्या काळातला हा एक मानबिंदू आहे. 

६. एकापेक्षा एक (Eka Peksha Ek)

एक ऐकू न येणारा बहिरा आणि तर दुसरा हे जग स्वतःच्या डोळ्यांनी बघू न शकणारा आंधळा एकमेकांचे जानी दोस्त असू शकतात? तर उत्तर आहे हो! एका पेक्षा एक ह्या सिनेमाची कथा काहीशी अशीच आहे. आर्थर हिलरच्या 1989 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सी नो इविल, हिअर नो इविल‘ या विनोदी चित्रपटावर आधारित असलेला हा सिनेमा असून लक्ष्मीकांत बेर्डे यात बहिरा तर सचिन पिळगावकर आंधळा दर्शवलेला आहे तर इन्सेप्क्टरच्या भूमिकेत आहे अशोक सराफ. सिनेमात लक्ष्याचं सचिनच्या बहिणीशी प्रेम प्रकरण दाखवलं असून सिनेमात ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा यांच्या दुकानात घडतो एक खून आणि पकडले जातात ते लक्ष्या आणि सचिन. आता नेमका खरा खुनी कोण? आणि त्याने तो का केला? हे शोधण्यात आपले नायक कशे यशस्वी होतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा बघायलाच पाहिजे.

७. धुमधडाका (Dhumdhadaka)

अरे धनाजीराव मुर्दाबाद! आठवतं हे गाजलेलं गाणं? बरं जाऊद्या सिनेमा बनवायचं वेड असलेला लक्ष्या त्याच्या वडिलांना म्हणजेच धनाजीरावांना हॉरर सिनेमाचं कथानक ऐकवत असतांना त्यांना लावलेलं लोणी! हा सीन तर नक्कीच आठवला असणार. अहो आम्ही बोलतोय धुमधडाका सिनेमाबद्दल. हा सिनेमा टीव्ही वर लागला म्हणजे ३ तासांचं निखळ मनोरंजन. आपल्या प्रेयसीला मिळवण्यासाठी आणि त्यांच्याशी लग्न करण्यासाठी ३ मित्र म्हणजेच लक्ष्या, महेश आणि अशोक जे नाटक करतात आणि शेवटी त्यातून उडणारी धमाल प्रेक्षकांना हसून पुरेवाट करते. हा सिनेमा 1985 मध्ये रिलीज झाला होता. शशी कपूरच्या हिंदी ‘प्यार किये जा’ची मराठी कॉपी असली तरी हा सिनेमा म्हणजे अस्सलाला मागे टाकेल अशी भारी कॉपी होती. 

हा सिनेमा तुम्ही Zee5 वर पाहू शकता. 

८. शेम टू शेम (Shame To Shame)

Shame To Shame

दोन जुळे भाऊ एक गावाकडे तर दुसरा शहरात राहून शिकून इंस्पेक्टर झालेला. लहानपणी यांचे वडील म्हणजे गावातील विश्वासू नाव. शेतजमीन माझ्या नावावर कर म्हणून सावकाराने त्यांच्याकडे तगादा लावला आहे. पण त्यांना कुठल्याही स्थितीत ती जमीन सावकाराला द्यायची नाहीये, पण लालसेपायी सावकार विद्युत रोहित्राखाली शॉक देऊन त्यांना ठार करतो. आता मोठं झालेल्या नायकाला म्हणजेच लक्ष्याला व्याजासहित पैसे देऊन ती जमीन वापस पाहिजे, परंतु ह्या घडामोडीदरम्यान आपल्या वडिलांचा खुनी सावकारच आहे हे त्याला कळतं. शहरातला जुळा भाऊ सुद्धा इथे त्याच्या मदतीला येतो आणि दोघे मिळून वडिलांच्या खुनाचा बदला घेतात अशी सिनेमाची कथा आहे. 

हा सिनेमा तुम्ही Xstream वर पाहू शकता. 

९. झपाटलेला (Zapatlela)

Zapatlela

मराठी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट बनले ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. ज्यांनी मोठयांसोबतच लहान मुलांचं बालपणही आगळंवेगळं बनवलं. अशाच काही चित्रपटांपैकी एक होता ‘झपाटलेला’. या चित्रपटात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. मात्र त्याहूनही एक महत्वाचं पात्र या चित्रपटात होतं, ते म्हणजे तात्या विंचू. या तात्या विंचूने लहान मुलांच्या मनात धडकी भरवली होती. आजही त्याला टीव्हीवर पाहून भीतीची लहर उठते. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, किशोरी आंबिये, विजय चव्हाण, मधु कांबिकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मराठी सिनेमात बोलक्या बाहुल्याचा प्रयोग पहिल्यांदाच ‘झपाट्लेलाच्या माध्यमातून झाला होता. या सिनेमातील तात्या विंचू हा असुरी हास्य असणारा बाहुला आजही लोकांना आठवणीत आहे.

हा सिनेमा तुम्ही Zee5 वर पाहू शकता. 

१०. दे दणादण (De Danadan)

De Danadan

१९८७ साली दे दणादण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात प्रेमा किरण, निवेदिता सराफ हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. या चित्रपटात आवडक्काची भूमिका अभिनेत्री प्रेमा किरण यांनी निभावली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. लक्ष्यासोबत त्यांचं  ‘पोलीस वाल्या सायकल वाल्या’ हे गाणं खुप गाजलं होतं. बजरंगबलीने दिलेलं वरदान आणि त्या जोरावर लक्षाने सिनेमात उडवलेली धमाल पहाताना वेळ कसा गेला हर प्रेक्षकांना कळतंच नाही. लाल रंगाकडे बघितल्यावर लक्ष्याची शक्ती अचानक नाहीशी होते ह्यावर आधारित सिनेतील सीन बघतांना हसून वाट लागते. 

हा सिनेमा तुम्ही Zee5 वर पाहू शकता. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Your email address will not be published.

Don't Miss