मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यानंतर अशोक सराफांवर सर्वस्थरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार तसेच “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” यासोबतच राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यासाठी दिमाखदार सोहळा गुरुवारी 22 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे पार पडला.राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत अकाऊंटवरून याची घोषणा करण्यात आली आहे. सीएमओ महाराष्ट्र या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्काराची घोषणा करताना लिहिण्यात आले की, ‘ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.’
पुढे या पोस्टमध्ये लिहिले की, ‘अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.’