Sangeet Natak Academy Awards 2024: संगीत नाटक अकादमी पुरस्कारांच्या (Sangeet Natak Academy Awards 2024) विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसाठी संगीत, नृत्य, रंगभूमी, पारंपारिक संगीत/नृत्य/नाट्य अशा विविध क्षेत्रातील 92 कलाकारांची निवड करण्यात आली आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांच्या विजेत्यांच्या यादीत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) यांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आता अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आलं आहे. तसेच ऋतुजा बागवेला देखील संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अशोक सराफ यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
गेली पन्नास वर्षे चतुरस्र अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची करमणूक करणाऱ्या अशोक सराफ यांना नुकतेच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. आता संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने हा आनंद द्विगुणित झाला आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कारांसह असंख्य पुरस्कार त्यांना या कलाप्रवासात आधीच लाभले आहेत. आता राष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या कला कारकिर्दीला पुरस्कार रूपाने दाद मिळाली आहे.
‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या ऋतुजाने मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. अपघातात दोन्ही हात गमावलेल्या जिद्दी तरुणीची भूमिका तिने ‘अनन्या’ या नाटकात केली होती. दोन्ही हात मागे बांधून दीड दोन तास रंगभूमीवर तिने साकारलेल्या अनन्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या भूमिकेसाठी तिला बारा पुरस्कार मिळाले शिवाय एका भूमिकेसाठी वर्षभरात सर्वाधिक पुरस्कार मिळवल्याचा विक्रमही तिच्या नावावर नोंदला गेला आहे.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते
– अशोक सराफ, अभिनय
– विजय शामराव चव्हाण, ढोलकीवादक
– कलापिनी कोमकली, हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत
– नंदिनी परब गुजर, सुगम संगीत
– सिद्धी उपाध्ये, अभिनय
– महेश सातारकर, लोकनृत्य
– प्रमिला सूर्यवंशी, लावणी
– अनुजा झोकरकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक
– सारंग कुलकर्णी, सरोद वादक
– नागेश आडगावकर, अभंग संगीत
– ऋतुजा बागवे, अभिनय
– प्रियांका शक्ती ठाकूर, पारंपारिक कला